(Image Source-Internet)
नागपूर :
राज्यातील नव्याने लागू करण्यात आलेल्या 'जन सुरक्षा कायदा'वरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या कायद्याला विरोध करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले. “दम असेल तर मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा!”
पुण्यातील एका सभेत बोलताना राज ठाकरे यांनी सरकारच्या नव्या कायद्यावर टीकास्त्र सोडलं. "हा कायदा सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांना अर्बन नक्षल ठरवून अटक करण्यासाठी आणला जात आहे. सरकारच्या धोरणांचा विरोध केला तर तुरुंगात टाकतील का? एकदा अटक करून दाखवा!" अशा शब्दांत त्यांनी फडणवीस सरकारला आव्हान दिलं.
ते पुढे म्हणाले, “या महाराष्ट्रात मराठी माणसांच्या कबरीवर उद्योग उभे राहू शकत नाहीत. जर खरोखरच उद्योग आणायचे असतील, तर मराठी जनतेच्या सन्मानासह आणा. अन्यथा हे उद्योग इथे टिकणार नाहीत.”
राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “हा कायदा राज ठाकरे यांच्यासारख्यांसाठी नाही. जोपर्यंत कुणी अर्बन नक्षलसारखं वागत नाही, तोपर्यंत कोणालाही अटक केली जाणार नाही.”
फडणवीस म्हणाले, “या कायद्याचा उद्देश सरकारविरोधातील आंदोलन थांबवणे नाही. लोकशाहीत सरकारवर टीका करण्याचं स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. मात्र, जो कोणी हिंसक मार्गाने, संविधानाविरोधात किंवा देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी होईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल.”
या वादामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा गतीमान झालं आहे. ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील ही थेट जुंपण राज्याच्या राजकीय रणभूमीवर काय रंग उधळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.