रायगडातील टाटा कर्करोग रुग्णालयासाठी शासनाकडून मुद्रांक शुल्क माफ; गरीब रुग्णांना मोठा दिलासा

    19-Aug-2025
Total Views |

Govt waives stamp duty
 (Image Source-Internet)
मुंबई :
महाराष्ट्र सरकारने आरोग्यसेवा विस्तारासाठी मोठे पाऊल टाकत रायगड (Raigad) जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या टाटा मेमोरिअल सेंटरच्या कर्करोग रुग्णालयाला मुद्रांक शुल्कातून सवलत दिली आहे. ३८.९९ लाख रुपयांचे शुल्क शासनाने माफ करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे हा प्रकल्प सुलभ होणार आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय मंजूर झाला. या प्रकल्पासाठी आवश्यक १० हेक्टर (सुमारे ४० एकर) शासकीय जमीन टाटा मेमोरिअल सेंटरला ३० वर्षांच्या कालावधीसाठी नाममात्र प्रति वर्ष एक रुपयाच्या भाड्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
तांबटी (ता. खालापूर) येथे उभारण्यात येणारे हे रुग्णालय १०० खाटांचे असेल. यातील १२ टक्के खाटा गरीब, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, सामान्य जनता आणि शासकीय कर्मचारी यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांनुसार सवलतीच्या दरात राखीव राहणार आहेत. शिवाय, रुग्णासोबतच्या व्यक्तीसाठी अत्यल्प खर्चात निवास सुविधा उपलब्ध करण्याची अट घालण्यात आली आहे.
 
महसूल विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना दर्जेदार व किफायतशीर उपचारांची सुविधा मिळणार आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या तरतुदीनुसार ही माफी दिली असून, विधी व न्याय विभागाशी सल्लामसलत करून यासंबंधी आदेश लवकरच राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहेत.
 
या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, “सरकारच्या या निर्णयामुळे टाटा मेमोरिअल सेंटरला कर्करोग उपचार आणि संशोधन सेवा वाढवता येईल. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनाही उत्तम आरोग्यसेवा सहज उपलब्ध होईल.”