(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
भारतातील खाणकाम क्षेत्रासाठी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. ओडिशा (Odisha) राज्यात सोन्याचे नवे साठे सापडले, अशी माहिती भूगर्भ सर्वेक्षण संस्था (GSI) यांनी दिली आहे. देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या जिल्ह्यांत सोनं आढळलं आहे. तसेच मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध भागातही शोधकार्य सुरू आहे. मार्च 2025 मध्ये खाणमंत्री बिभूती भूषण जेना यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली होती.
किती सोनं मिळणार?
अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर नाही. मात्र भूगर्भ तज्ज्ञांच्या अंदाजानुसार येथे 10 ते 20 मेट्रिक टन सोने असू शकते. भारत दरवर्षी 700-800 मेट्रिक टन सोने आयात करतो. त्याच्या तुलनेत ही मात्रा कमी असली, तरी देशांतर्गत उत्पादनात हा मोठा टप्पा मानला जातो. 2020 मध्ये भारताचं वार्षिक उत्पादन फक्त 1.6 टन इतकं होतं. त्यामुळे हा शोध आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
अर्थव्यवस्थेला नवी गती-
ओडिशा सरकार, ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन (OMC) आणि GSI या खाणींच्या व्यावसायिकीकरणाची तयारी करत आहेत. देवगड येथील पहिला सोन्याचा ब्लॉक लिलावासाठी सज्ज असून, यामुळे राज्य सरकारच्या महसुलात वाढ होणार आहे. रोजगार, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि सेवा क्षेत्रांमध्येही प्रचंड संधी निर्माण होणार आहेत.
ओडिशा , खनिज संपत्तीचं केंद्रबिंदू-
ओडिशा आधीपासूनच खनिज संपत्तीने समृद्ध राज्य आहे. देशातील 96% क्रोमाईट, 52% बॉक्साईट आणि 33% लोखंडी खनिज इथेच आहे. आता सोन्याचे साठे सापडल्यामुळे ओडिशा खनिज संपत्तीच्या नकाशावर आणखी ठळक ठरणार आहे.तज्ज्ञांच्या मते, या साठ्यांमुळे केवळ राज्यालाच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल.