पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत; पालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही

    18-Aug-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 (Image Source-Internet)
नागपूर :
नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी रविवारी नियोजन भवनात नागरिकांच्या मागण्यांवर चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पावसामुळे झालेले नुकसान, स्थानिक स्वराज्य निवडणुका आणि काँग्रेसच्या आरोपांवर त्यांनी भूमिका मांडली.
 
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, “ज्या भागांत पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त झाले आहे, तेथे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नियमांनुसार बाधितांना नुकसानभरपाई देण्यात येईल.”
 
स्थानिक निवडणुकांच्या तयारीवर भाष्य करताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवि चव्हाण आणि मी महायुतीसोबतच निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. मात्र जिथे युती शक्य होणार नाही, तेथे निवडणुका सौहार्दाने होऊन महायुतीला तोटा होणार नाही, याची जबाबदारी स्थानिक नेतृत्वाने घ्यावी.”
 
काँग्रेसकडून भाजपवर करण्यात येणाऱ्या ‘मत चोरी’च्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच मतदार याद्यांची पडताळणी करावी. कारण या निवडणुका या विधानसभा मतदार याद्यांवर आधारित असतात. त्यामुळे काही आक्षेप असल्यास आताच नोंदवावेत. पराभवानंतर दोष मतदार याद्यांवर ढकलणे अयोग्य आहे.”