मुंबईतील मानखुर्दमध्ये दहीहंडी उत्सवात अपघात; गोविंदाचा उंचावरून पडून मृत्यू

    16-Aug-2025
Total Views |
 
Govinda dies
 (Image Source-Internet)
मुंबई :
दहीहंडीच्या (Dahi Handi) तयारीदरम्यान मानखुर्द परिसरात झालेल्या अपघातामुळे उत्सवाचे वातावरण क्षणात शोकमय बनले. उंचावरून पडल्याने एका गोविंदाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव जगमोहन शिवकिरण चौधरी (वय ३२) असे आहे.
 
शनिवारी सकाळी मानखुर्दमध्ये दहीहंडी सोहळ्याच्या आयोजनाची धामधूम सुरू होती. यावेळी बाल गोविंदा पथकातील जगमोहन चौधरी हे दोरी बांधण्याचे काम करत होते. परंतु उंचावर उभे असताना त्यांचा तोल गेला आणि ते जोरात खाली आदळले. डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
 
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आनंदोत्सव अचानक शोकांतिका ठरल्याने पथकातील सदस्य आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चौधरी हे अनेक वर्षांपासून दहीहंडी सोहळ्यात सहभागी होत असून, त्यांच्या उत्साही स्वभावामुळे त्यांची विशेष ओळख होती.
 
दरवर्षी दहीहंडी उत्सवावेळी अशा घटना घडत असून, अनेक गोविंद्यांचे प्राण जातात किंवा ते गंभीर जखमी होतात. प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजना केल्या जातात, तरीही अपघातांचा धोका कायम असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.
 
या अपघाताची नोंद मानखुर्द पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, तपास सुरू आहे.