नागपुरात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी समन्वय बैठक

    16-Aug-2025
Total Views |
-  विविध मुद्यांवर झाला सकारात्मक संवाद

Coordination meeting(Image Source-Internet) 
नागपूर :
शहरात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या (Stray dogs) समस्येकडे आता प्रशासन गांभीर्याने पाहू लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी न झाल्याने नाराजी व्यक्त करत, या विषयावर समन्वय बैठक घेण्याचे आदेश दिले होते.
 
त्या आदेशानुसार शनिवारी पोलीस भवनात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापालिका, जिलाधिकारी कार्यालय आणि पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
या बैठकीत नागपूरमधील प्राणी कल्याण संस्था, सामाजिक संघटना तसेच प्राणीप्रेमी नागरिकांनीही सक्रिय सहभाग घेतला. शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर उपाययोजना आखताना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी मते मांडली आणि त्यावर शक्यतोडगा काढण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
 
पशुप्रेमींनी न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची तयारी दर्शविताना, अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींवर पोलिस प्रशासनाकडून सहकार्य मिळावे, अशी मागणीही केली. या चर्चेमुळे भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी ठोस धोरण आखण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.