काँग्रेसला आणखी एक जबर धक्का;'या' बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम

    16-Aug-2025
Total Views |
 
Congress
 (Image Source-Internet)
मुंबई :
विधानसभेतील पराभवाच्या धक्क्यातून सावरायच्या आधीच काँग्रेसला (Congress) गळतीचे नवे फटके बसतच आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीतील नेत्यांचे इतर पक्षांत जाण्याचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. आता अमरावती आणि जळगाव जिल्ह्यातून काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी काढता पाय घेतला आहे.
 
अमरावतीतील वरुड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार अनिल बोंडे आणि आमदार उमेश यावलकरही उपस्थित होते. विक्रम ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
 
दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा **प्रतिभा शिंदे** या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये दाखल झाल्या आहेत. जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी तब्बल 20-25 हजार आदिवासी कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित होते.
 
शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी थेट पक्ष सोडत नव्या संघटनेत प्रवेश केल्याने जळगावमधील काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसला आहे.
 
काँग्रेससाठी संकटांचे काळे ढग-
महाविकास आघाडीचा पराभव, आणि त्यातही काँग्रेसला मिळालेल्या केवळ ५० जागा यामुळे पक्ष आधीच संकटात असताना, आता ही सलग सुरू असलेली गळती काँग्रेससाठी गंभीर इशारा आहे.
 
दरम्यान, राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रभावी नेते आपल्या गळाला लावण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे आगामी निवडणुकांत काँग्रेसच्या रणनीतीवर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.