(Image Source-Internet)
इस्लामपूर :
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय व अन्य प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यात रंगलेल्या भाषणांमुळे व्यासपीठावरच राजकीय खुमासदार जुगलबंदी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), भाजप नेते चंद्रकांत पाटील, माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांची उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यात टोलेबाजी अनोख्या शैलीत रंगली.
या कार्यक्रमात भाषण करताना रोहित पवार यांनी मिश्कीलपणे म्हटले की, “या संस्थेसाठी मी ४० लाख देतो, त्यावर चंद्रकांतदादांनी एक शून्य वाढवावे, जयंत पाटील आणखी एक, आणि अजितदादांकडे तर वित्तखाताच आहे, त्यांनी दोन शून्य जोडावेत.” या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील तावातावाने म्हणाले, “आम्ही काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय का?” असा प्रतिप्रश्न करत त्यांनी टोला लगावला.
यानंतर अजित पवारांनी चंद्रकांतदादांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवार कुटुंबातल्या सर्वात लहान सदस्याची रोहित पवारांची बाजू घेत मिश्कील शैलीत पलटवार केला.
कार्यक्रमाचे औचित्य, व्यासपीठावरचे वजनदार नेते आणि रंगलेली राजकीय टोलेबाजी यामुळे हा उद्घाटन सोहळा केवळ शैक्षणिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता एकप्रकारे राजकीय रंगतदार मैफलच ठरली.