(Image Source-Internet)
मुंबई:
१५ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेने मांस विक्री आणि कत्तलखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक राजकीय पक्षांनी या निर्णयावर टीका केली असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले, “स्वातंत्र्यदिनी जर सरकार नागरिकांच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालणार असेल, तर तो खरा स्वातंत्र्यदिन कसा म्हणायचा?” त्यांनी पुढे सांगितले की, “कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला किंवा सरकारला नाही. मी आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, मांस विक्री बंद करू नका.”
ठाकरे यांच्या मते, लोकांच्या वैयक्तिक पसंतीवर अशा प्रकारे निर्बंध आणणं म्हणजेच स्वातंत्र्याच्या मूल्यांना तिलांजली देणं होय. “धर्म, परंपरा आणि खाण्याच्या सवयी यावरून कोणते निर्णय घ्यायचे हे सरकारचं काम नाही,” असं ते म्हणाले.
दरम्यान, या बंदीविरोधात डोंबिवलीतील खाटीक समाजाने रस्त्यावर उतरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी बंदी हटवण्याची मागणी केली आहे. मात्र, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली असून, हा निर्णय पूर्वीपासून लागू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
या निर्णयामुळे सध्या स्थानिक पातळीवर सामाजिक आणि राजकीय वाद अधिकच गहिरे होताना दिसत आहेत.