नागपुरात तहसील पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आंतरराज्यीय वाहनचोर टोळी पकडली, ४१ दुचाकी हस्तगत

    14-Aug-2025
Total Views |
 
Tehsil police
 (Image Source-Internet)
नागपूर :
तहसील पोलिसांनी (Tehsil police) शहरात मोठी कारवाई करत दोन कुख्यात आंतरराज्यीय वाहन चोरांना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ४१ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी नागपूरातील गाड्या चोरून त्या मध्य प्रदेशात विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.
 
गुन्हेगारी जगतात कुप्रसिद्ध असलेला प्रल्हाद उर्फ करण चोखेलाल चंद्रवंशी (रा. सिवनी, मध्य प्रदेश) हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून त्याच्यावर मध्य प्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत. नागपूरात झालेल्या वाहन चोरीच्या प्रकरणांत पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा शोध घेण्यात आला. अखेर दहा दिवसांपूर्वी डागा रुग्णालयाजवळ चोरीच्या दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्याला गजाआड केले. त्यावेळी त्याच्या कबुलीजबाबावरून १० चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या.
 
चौकशीत प्रल्हादने पोलिसांना सांगितले की, तो नागपूरातून गाड्या चोरून सिवनी येथे आपल्या साथीदार ब्रजकिशोर चंद्रवंशीकडे नेऊन देत असे. पुढे ब्रजकिशोरच त्या वाहनांची विक्री करत असे. पोलिसांनी या दोघांकडून मिळालेल्या माहितीवरून आतापर्यंत ४१ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून, त्यापैकी ३२ गाड्या नागपूरातून चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.