(Image Source-Internet)
नागपूर :
शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक विभागाने आता अधिक कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. गुरुवारी पोलिस आयुक्तालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या बाबत सविस्तर चर्चा होऊन कार्ययोजना आखण्यात आली.
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, बेफाम वेगाने वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे आणि अल्पवयीनांकडून दुचाकी चालवून घेणे यासारख्या प्रकारांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. विशेषतः अल्पवयीनांच्या प्रकरणात त्यांच्या पालकांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात थेट गुन्हा नोंदविला जाईल.
वाहतूक पोलिसांशी कारवाईदरम्यान वाद घालणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ड्युटीवर असताना सर्व कर्मचाऱ्यांनी बॉडी-वॉर्न कॅमेरे वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संयुक्त पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सांगितले की, अशा कॅमेऱ्यांच्या मदतीने वादग्रस्त घटना लगेच नोंदवल्या जातील आणि त्यावर त्वरीत कठोर कारवाई शक्य होईल. तसेच, पोलिसांनी स्वतःही ड्युटी दरम्यान शिस्त पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, २० ऑगस्टपासून शहरात प्रवासी बसांना प्रवेशबंदी लागू आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालक व चालकांविरुद्ध कुठलीही भीड न बाळगता कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी बैठकीत दिले. यामुळे शहर अधिक सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.