(Image Source-Internet)
नागपूर :
वर्षाच्या अखेरीस राज्यातील महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार असून, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही विकासकामांसाठी गती दिली असून नागपूर (Nagpur) व चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपंचायतींना ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही रक्कम दोन्ही जिल्ह्यांतील विविध नगरपंचायतींमध्ये वितरित करण्यात येणार आहे.
बुधवारी राज्य सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतींच्या विकासासाठी एकूण ५०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. यामध्ये विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचाही समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी, महादुला, पिंपळा आणि बहादुरा नगरपंचायतींसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या सर्व नगरपंचायती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात येतात.
तर, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर आणि पोंभूर्णा नगरपंचायतींसाठीही १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, हा निधी भाजप नेते व माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील या दोन्ही नगरपंचायतींमध्ये समान प्रमाणात वाटला जाणार आहे.
याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड व देऊळगाव नगरपंचायतींसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.