(Image Source-Internet)
मुंबई :
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती, उद्योगपती राज कुंद्रा, यांच्याविरोधात पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. व्यापारी दीपक कोठारी यांनी दोघांवर व आणखी एका व्यक्तीवर तब्बल 60.4 कोटींची रक्कम फसवल्याचा आरोप केला असून, हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) तपासासाठी देण्यात आले आहे.
दीपक कोठारी, जे लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक आहेत, यांच्या तक्रारीनुसार, 2015 मध्ये शिल्पा आणि राज यांनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांच्याकडून निधी घेतला. मात्र, तो पैसा कंपनीच्या कामासाठी न वापरता वैयक्तिक खर्चासाठी वळवण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. 2015 ते 2023 या काळात या निधीचा गैरवापर झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास EOW कडे सोपवला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, शिल्पा आणि राज यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा वाद नवा नसून नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT), मुंबई येथे यावर सुनावणी होऊन 4 ऑक्टोबर 2024 रोजी निकाल लागलेला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण पूर्णपणे दिवाणी स्वरूपाचे असून, यात फौजदारी गुन्ह्याचा प्रश्नच नाही.
पाटील यांनी पुढे सांगितले की, कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने हा व्यवहार न्यायालयीन प्रक्रियेत गेला होता. संबंधित ऑडिटर्सनी EOW कडे सर्व आवश्यक कागदपत्रे दिली असून, चार्टर्ड अकाउंटंटने गेल्या वर्षभरात पोलिसांना अनेकदा माहिती सादर केली आहे. त्यांचा ठाम दावा आहे की, ही गुंतवणूक पूर्णपणे इक्विटीवर आधारित होती आणि कंपनीविरुद्ध आधीच लिक्विडेशन ऑर्डर जारी झाला आहे. त्यामुळे हे सर्व आरोप निराधार असून, त्यांच्या क्लायंटची प्रतिमा मलिन करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न आहे.