(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
देशभरातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) केंद्र सरकारकडून मोठा दिलासा जाहीर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आज सोमवारी ३० लाख शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तब्बल ३,२०० कोटी रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमातून ही रक्कम डिजिटल पद्धतीने हस्तांतरित करतील. या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी आणि राज्याचे कृषी मंत्री किरोरी लाल मीना उपस्थित राहणार आहेत.
राज्यनिहाय निधी वाटप-
अधिकृत माहितीनुसार, या रकमेपैकी १,१५६ कोटी रुपये मध्य प्रदेशातील, १,१२१ कोटी रुपये राजस्थानातील, १५० कोटी रुपये छत्तीसगडमधील आणि ७७३ कोटी रुपये इतर राज्यांतील शेतकऱ्यांना दिले जातील.
दावा निपटारा प्रक्रियेत बदल-
केंद्राने अलीकडेच दावा निपटारा पद्धतीत सुधारणा केली असून, राज्य सरकारांच्या प्रीमियम योगदानाची प्रतीक्षा न करता केवळ केंद्रीय अनुदानाच्या आधारे दावे निकाली काढले जातील.
उशीर झाला तर दंड--
खरीप हंगाम २०२५ पासून जर राज्य सरकारांनी अनुदानाचा हिस्सा उशिरा दिला, तर त्यांच्यावर १२ टक्के दंड आकारला जाईल. तसेच विमा कंपन्यांनीही दावे विलंबाने निकाली काढल्यास त्यांच्यावर समान दंड लागू होईल.
२०१६ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आतापर्यंत १.८३ लाख कोटी रुपयांचे दावे शेतकऱ्यांना मिळाले असून, यासाठी त्यांनी केवळ ३५,८६४ कोटी रुपयांचा प्रीमियम भरला आहे.