नागपूर महापालिका निवडणूकीच्या तयारीला वेग; प्रभाग रचनेचा मसुदा अंतिम टप्प्यात

    01-Aug-2025
Total Views |
 
NMC elections
 (Image Source-Internet)
 
नागपूर (Nagpur) शहरातील महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून, नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा मसुदा ५ ऑगस्टपूर्वी नगर विकास विभागाकडे सादर केला जाणार आहे.
 
प्रभागांची ही नवीन मांडणी फारशी वेगळी नसून, यामध्ये केवळ काही लहानसहान बदल करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती होईल, असा अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
 
२०१७ मध्ये भाजपने १०८ जागा जिंकत महापालिकेवर वर्चस्व मिळवले होते. काँग्रेसच्या ताब्यात २९, बसपाकडे १२, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे अनुक्रमे २ आणि १ जागा होत्या.
 
यावेळी महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. एकूण १५६ जागांपैकी ७८ जागा महिलांसाठी असतील. यामध्ये अनुसूचित जातीतील महिलांसाठी १२ आणि अनुसूचित जमातीतील महिलांसाठी ६ जागा आरक्षित ठेवण्याची शक्यता आहे.
 
प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीसंदर्भातील अंतिम कार्यक्रम ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. त्यानुसार डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीत नागपूर महापालिकेची निवडणूक होऊ शकते.
 
सध्या राजकीय पक्षांनी आपल्या संभाव्य उमेदवारांची निवड व प्रचाराचे नियोजन सुरू केले असून, नागपूरकरांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.