वादग्रस्त मंत्री कोकाटे यांचं खातं बदललं; कृषी विभाग हिसकावून खेळ खात्याची जबाबदारी

    01-Aug-2025
Total Views |
 
Manikrao Kokate
 (Image Source-Internet)
मुंबई :
सातत्याने वादग्रस्त विधानं आणि वर्तणुकीमुळे चर्चेत आलेले मंत्री मानिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर अखेर शिस्तीचा बडगा उचलण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्या ताब्यातील कृषी मंत्रालय काढून घेण्यात आलं असून, त्यांच्यावर आता केवळ खेळ व युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे.
 
दरम्यान, कोकाटेंकडून रिक्त झालेल्या कृषी विभागाची जबाबदारी आता माजी क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे. भरणे हे राज्याचे नवे कृषी मंत्री असतील.
 
कोकाटेंच्या वादग्रस्त वर्तनामुळे सरकारची अडचण-
शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, सरकारला "भिकारी" म्हणण्यासारखी बेताल विधाने, तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत 'रमी' खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल होणे, अशा घटनांमुळे कोकाटे सतत वादाच्या भोवऱ्यात राहिले.
 
या प्रकरणांमुळे विरोधकांनी केवळ कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, तर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही टीकेची झोड उठवली होती. यामुळे सरकारची विश्वासार्हता आणि प्रतिमा जनतेसमोर डागाळली जात असल्याची टीका झाली.
 
अजित पवारांचा निर्णय ठरला निर्णायक-
कोकाटेंच्या वर्तनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांनी कठोर निर्णयाचे संकेत दिल्यानंतर अखेर कोकाटेंच्या खात्यात बदल करण्यात आला. कृषी विभाग काढून घेऊन त्यांना खेळ विभागाच्या मर्यादित जबाबदारीवर ठेवण्यात आलं.
 
हा बदल केवळ प्रशासनिक नाही, तर एक स्पष्ट संदेश आहे की, मंत्र्यांच्या वर्तनाबाबत आता सरकार अधिक गंभीर आहे.