(Image Source-Internet)
नवी दिल्ली:
बिहारमधील मतदार यादीतील त्रुटींवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगावर थेट मतांची चोरी केल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना, "आमच्याकडे ठोस पुरावे आहेत की निवडणूक आयोगच मतांची चोरी करत आहे. मी कोणतीही थट्टा करत नाही, शंभर टक्के पुराव्यानिशी हे सांगतो," असे वक्तव्य त्यांनी केले.
या विधानावर राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता यावर निवडणूक आयोगाने मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना 'निराधार आणि बेजबाबदार' असे संबोधित केले असून, असे रोजचे आरोप दुर्लक्ष करण्यासारखे असल्याचे सांगितले.
"निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकारच्या बिनबुडाच्या आरोपांकडे लक्ष देऊ नये," असे आवाहन आयोगाने केले आहे. तसेच, दररोज होणाऱ्या अशा धमक्यांनाही आयोग दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादींचे पुर्नपरीक्षण सुरू आहे. यामध्ये अनेक बोगस मतदार सापडल्याने विरोधकांनी या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर थेट सहभागाचे आरोप करत राजकीय वर्तुळात नवा वाद पेटवला आहे.