(Image Source-Internet)
मुंबई :
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठा बदल करत माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली असून, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकाटे यांचा ऑनलाईन गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना क्रीडा मंत्रालय देण्यात आलं आहे.
दत्तात्रय भरणे यांनी नव्या पदाचा स्वीकार करताच माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं, “एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला कृषीखात्याची जबाबदारी मिळणं, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी व वरिष्ठ नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.”
कर्जमाफीवर बोलायला लवकर –
कर्जमाफीबाबत विचारल्यावर भरणे म्हणाले, “अद्याप मी खात्याचा कार्यभार स्वीकारलेला नाही. खात्याची सविस्तर माहिती घेतल्याशिवाय कोणतीही ठोस भूमिका घेणं योग्य ठरणार नाही. कर्जमाफीसारख्या निर्णयांचा अधिकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे आहे.”
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार-
शेतकऱ्यांसाठी काय योजना राबवणार यावर बोलताना भरणे म्हणाले, “नव्या तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत शेती, आणि शेतकऱ्यांना थेट मदत मिळवून देणं हे माझं मुख्य उद्दिष्ट राहील. समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी धोरणात्मक पावलं उचलणार आहे.”
आत्महत्यांचा प्रश्न गांभीर्याने हाताळणार-
शेतकरी आत्महत्यांबाबत विचारल्यावर भरणे म्हणाले, “मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे त्यांच्या वेदना मला उमगतात. पदभार स्वीकारल्यानंतर या गंभीर विषयाचा सखोल अभ्यास करून ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन.”
नवीन कृषीमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांनी संयम आणि शिस्तीत भूमिका मांडत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. आता त्यांच्या पुढील कृतीकडे राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.