कृषिमंत्रिपदाची पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती;छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

    01-Aug-2025
Total Views |
 
Ajit Pawar Chhagan Bhujbal
 (Image Source-Internet)
नाशिक :
कृषि खात्याच्या अदलाबदलीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती," असे त्यांनी स्पष्ट करत माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.
 
सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री माणिकराव कोकाटे पत्त्यांचा गेम खेळताना आढळले होते. त्यानंतरच त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले असून, हे खाते आता दत्ता भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. कोकाटेंकडे आता केवळ क्रीडा खात्याची जबाबदारी आहे.
 
या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, "खाते कोणाकडे द्यायचे, हे निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतात. मी अधिक बोलणं योग्य ठरणार नाही. मी फक्त एवढंच सांगू शकतो की, जेव्हा आम्ही भाजप व शिंदे गटाच्या सरकारमध्ये सामील झालो, तेव्हा अजित पवारांनी मला कृषी खात्याची ऑफर दिली होती."
 
भुजबळ पुढे म्हणाले, "माझ्या समोर सर्व खात्यांची यादी ठेवण्यात आली होती. पण, मीच म्हणालो की कृषी खाते ग्रामीण भागातील नेत्यांकडे असले पाहिजे. तेव्हाच मी हे खाते घेण्यास नकार दिला. कुठलेही खाते लहान-मोठे नसते, आपण त्यात काय कामगिरी करतो यावर सगळं अवलंबून असतं."
 
दत्ता भरणे यांच्यावर विश्वास व्यक्त करत भुजबळ म्हणाले, "दत्ता भरणे ग्रामीण भागातले आहेत. त्यांना शेतीविषयक प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यामुळे ते या खात्याला पूर्णपणे न्याय देतील."
 
भुजबळांच्या या वक्तव्यानंतर आता कोकाटे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.