(Image Source-Internet)
नागपूर :
नागपूर सुधार प्रन्यासाच्या (एनआयटी) पूर्व नागपूर कार्यालयात गुरुवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी धडक देत सहाय्यक स्थापत्य अभियंता सुरेश चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फेकली. हा प्रकार घडताच परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मनसे कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चव्हाण हे २०१४ पासून एनआयटीमध्ये कार्यरत असून त्यांनी विविध प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप आहेत. विशेषतः नागरी सुविधांशी संबंधित पट्ट्यांच्या मंजुरीसाठी २५ हजार आणि डिमांड नोटसाठी तब्बल १२ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
साल २०२३ मध्ये मनसेने एनआयटीमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठा मोर्चा काढला होता. त्या वेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सुरेश चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात सविस्तर तक्रारीसह पुरावे प्रशासनाकडे देण्यात आले होते. त्यानंतर चव्हाण यांची बदली दक्षिण नागपूरमध्ये झाली होती. मात्र, अलीकडेच त्यांची पूर्व नागपूर कार्यालयात पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली.
गुरुवारी मनसे कार्यकर्ते कार्यालयात घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. त्यांच्या गळ्यात निषेधाचे हारही घालण्यात आले. या घटनेनंतर कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, एनआयटी प्रशासनानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या घटनेवर एनआयटी आणि पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून मनसेने संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे.