(Image Source-Internet)
मुंबई :
2008 साली मालेगावमध्ये घडलेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. या खटल्यात तब्बल १७ वर्षांनंतर भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांच्यासह सातही आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आलं. पुराव्यांचा अभाव आणि तपासातील त्रुटींमुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
मालेगावमधील भिकू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास स्फोट झाला होता. रमजान आणि नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे राज्यात आणि देशात खळबळ उडाली होती. स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते.
या घटनेच्या तपासात सुरुवातीपासूनच अनेक वळणे आणि वाद निर्माण झाले. एनआयएने सादर केलेल्या पुराव्यांवर संशय निर्माण झाला आणि साक्षी-पुराव्यांमध्ये विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आलं. मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करता आलं नाही, तसेच स्फोटस्थळाच्या तपासात बोटांचे ठसे, ठोस नमुने आणि डिजिटल माहिती गोळा करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.
तपास यंत्रणांनी दाखल केलेले काही वैद्यकीय पुरावे संशयास्पद असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं. काही वैद्यकीय अहवालांमध्ये फेरबदल करण्यात आले होते, अशी गंभीर टिप्पणी निकालात करण्यात आली आहे.
श्रीकांत पुरोहित यांच्या निवासस्थानी स्फोटके साठवण्यात आली होती, असा आरोपही न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच स्फोटात वापरलेली मोटारसायकल प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या मालकीची असल्याचा दावा तपास यंत्रणांनी सिद्ध करू शकला नाही.
१७ वर्षांनंतर न्यायालयाचा आलेला हा निकाल अनेकांसाठी धक्का देणारा असला, तरी कायदेशीर प्रक्रियेत पुराव्यांचा अभाव किती निर्णायक ठरू शकतो, याचं हे उदाहरण ठरलं आहे. या निर्णयावर विविध राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.