"भगवा दहशतवाद"ही संकल्पना म्हणजे काँग्रेसच्या राजकीय स्वार्थाचे साधन ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

    31-Jul-2025
Total Views |
 
Eknath Shinde
 (Image Source-Internet)
मुंबई :
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली. "भगवा दहशतवाद" ही संकल्पना म्हणजे काँग्रेसच्या राजकीय स्वार्थाचे साधन होते. हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी हा बनाव उभा केला गेला होता. आता सत्य उजेडात आलं असून, काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची क्षमा मागावी," अशी मागणी त्यांनी केली.
 
शिंदे म्हणाले की, “साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित आणि इतर पाच जणांना तब्बल १७ वर्षे खोट्या आरोपांमुळे तुरुंगवास भोगावा लागला. हा फक्त कायद्याचा नव्हे, तर माणुसकीचाही अपमान होता. आजच्या न्यायालयीन निकालामुळे त्यांच्यावर लादलेला अपप्रचार धुळीला मिळालाय.”
 
“गर्व से कहो हम हिंदू हैं” ही घोषणा आता अधिक बुलंदपणे देशभरात घुमेल, असं सांगतानाच त्यांनी स्पष्ट केलं की, “शिवसेना शिंदे गट या निर्दोष नागरिकांच्या पाठीशी सतत खंबीरपणे उभा राहिला. न्यायालयीन निर्णयाने आज सत्याचा विजय झालाय.”
 
शिंदेंनी काँग्रेसवर आरोप केला की, “हिंदू दहशतवाद” ही कल्पना काँग्रेसने निर्माण करून समाजात विष कालवले. हा शब्दप्रयोग केवळ निवडणूक फायद्यासाठी वापरला गेला. मात्र आता सत्य समोर आलं असून, काँग्रेसचा खोटेपणा उघड झाला आहे.”
 
हिंदू धर्म सहिष्णु आहे. पण त्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेत भगव्या रंगाला दहशतवादाशी जोडण्याचा जो प्रयत्न झाला, त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. हा एक काळा अध्याय होता, जो आज संपला आहे,असे शिंदे म्हणाले.