राज्य काँग्रेस कार्यकारिणी जाहीर; नागपूरच्या नेतृत्वाला मोठा सन्मान

    30-Jul-2025
Total Views |
 
State Congress
 (Image Source-Internet)
नागपूर :
काँग्रेस (Congress) पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची नवी यादी अखेर जाहीर करण्यात आली असून, नागपूरच्या अनेक वरिष्ठ आणि नव्या नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभेतील पराभवानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या हाती नेतृत्वाची धुरा आली होती. त्यांनी कार्यकारिणीची घोषणा लांबवली होती, मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे.
 
हर्षवर्धन सपकाळ यांनी अनुभव आणि युवा जोश याचा समतोल राखत कार्यकारिणीची रचना केली आहे. नागपूर शहराच्या राजकीय भूमिकेला प्राधान्य देत, त्यांनी जुन्या अनुभवी नेत्यांची निवड कायम ठेवत, नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
 
या नव्या कार्यकारिणीत माजी मंत्री अनीस अहमद, आमदार अभिजीत वंजारी, ज्येष्ठ नेते नाना गावंडे आणि माजी राज्य मंत्री राजेंद्र मुलक यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अशोक धवड, आसिफ कुरेशी, हिदायत पटेल, सुरेश भोयर, किशोर कान्हेरे, तक्षशिला वाघधरे आणि विशाल मुत्तेमवार यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. अतुल लोंढे यांची वरिष्ठ प्रवक्ते पदावर फेरनियुक्ती झाली आहे.
 
या कार्यकारिणीत काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मातब्बर नेत्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, विजय दर्डा, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार विकास ठाकरे, ए. संजय मेश्राम, सुनील केदार, रामकिशन ओझा, प्रफुल्ल गुडधे, दीपक कटोले, नितीन कुंभळकर यांचा समावेश आहे.
 
ही नव्या स्वरूपात साकारलेली कार्यकारिणी आगामी राजकीय लढतींसाठी पक्षाला मजबुती देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.