(Image Source-Internet)
मुंबई :
राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) महाराष्ट्राला मोठं संकट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा दिला असून, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील ११ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
नागपूरसह विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नागपूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, जिल्हाधिकारी विपीन इटकर यांनी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. आतापर्यंत ४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून, गरज पडल्यास लष्कराची मदत घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. शहरातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. रायगड, रत्नागिरी आणि मुंबईसह काही भागांमध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. किनारपट्टीच्या भागात समुद्र खवळलेला असून, नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांवर जाणं टाळावं, असा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार सरी कोसळत असून, नद्या व नाल्यांचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा आहे.
राज्य सरकारने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी अपडेट देत आहे. नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता अधिकृत माहितीनुसारच कृती करावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.