शिक्षक शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी नागपूर SIT कडे; संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकरणांचा समावेश

    29-Jul-2025
Total Views |
 
Shalarth ID scam
 (Image Source-Internet)
नागपूर :
राज्यभरात उघडकीस आलेल्या बनावट शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी गैरवापर प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नागपूर पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाला (SIT) आता संपूर्ण राज्यातील अशा स्वरूपाच्या सर्व गुन्ह्यांची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (परिक्षेत्र २) नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखालील ही टीम या घोटाळ्याचा सखोल तपास करणार आहे.
 
तपासाच्या दरम्यान घोटाळ्याचा विस्तार उघड-
सदर आणि सायबर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींच्या तपासादरम्यान, या घोटाळ्याचे जाळे केवळ नागपूरपुरते मर्यादित नसून ते राज्याच्या विविध भागांत पसरल्याचे आढळले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यांचाही समावेश आहे, ज्यांची चौकशी यापूर्वी स्थानिक पातळीवर सुरू होती.
 
एकत्रित तपासासाठी विशेष जबाबदारी-
या घोटाळ्याचा विस्तार लक्षात घेता, अनेक पोलीस ठाण्यांमधून एकाच प्रकारचे गुन्हे उघडकीस येत असल्यामुळे या प्रकरणांची एकाच तपास यंत्रणेमार्फत चौकशी होणे आवश्यक होते. म्हणूनच नागपूर SIT ला संपूर्ण महाराष्ट्रभरातील संबंधित गुन्ह्यांची चौकशी करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. नित्यानंद झा हे त्यांच्या टीममध्ये अन्य आवश्यक अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करू शकणार आहेत.
 
तातडीने कारवाईचे आदेश-
राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक दस्तऐवज SIT कडे तात्काळ सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपास लवकरात लवकर पूर्ण करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
 
संपूर्ण प्रकरणाचा वेध घेण्याचा प्रयत्न-
या निर्णयामुळे बनावट शिक्षक भरती प्रक्रियेमागील संपूर्ण यंत्रणा, त्यातील दोषी व्यक्ती आणि आर्थिक गैरव्यवहार याचे जाळे समोर येईल, अशी अपेक्षा आहे. या पथकाच्या तपासातून दोषींवर कठोर कारवाई होणार असून, भविष्यात अशा प्रकारच्या प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.