- १.९४ किलो अमली पदार्थ जप्त
(Image Source-Internet)
नागपूर :
कळमना पोलिसांनी (Kalamana police) अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत ओम नगर परिसरात मोठी कारवाई करत एका इसमाच्या घरातून जवळपास १.९४ किलो गांजा हस्तगत केला आहे. ही कारवाई २८ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या दरम्यान प्लॉट क्रमांक ८२, आटा चक्की जवळ करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून आरोपी नरेश उर्फ पप्पू जगदीशप्रसाद श्रीवास्तव (वय ५५) याच्या घराची झडती घेतली. साक्षीदारांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या तपासणीत कपाटाखाली लपवून ठेवलेली गांजाची पिशवी सापडली. तसेच वजन मोजण्यासाठी वापरला जाणारा काटाही जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा जप्त गांजा विक्रीसाठी साठवून ठेवत होता. जप्त अमली पदार्थ आणि वजन काट्याची एकूण किंमत अंदाजे ५१ हजार रुपये आहे.
या प्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS) अंतर्गत कलम ८(क), २०(ब)(२)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.