(Image Source-Internet)
नागपूर :
उपराजधानीमध्ये मंगळवारी सकाळपासून पावसाने (Rain) जोर धरला असून, शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.
सोमवारी दिवसभर रिमझिम सरी कोसळत होत्या. मात्र, मंगळवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाच वाजल्याच्या सुमारास पडायला लागलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत.
शाळा आणि कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहने संथगतीने सरकत आहेत. काही ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने नागपूरसाठी पुढील दोन दिवसांसाठी 'येलो अलर्ट' दिला आहे. येत्या ४८ तासांत शहरात जोरदार ते अतिजोरदार सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पावसाचे अंदाज लक्षात घेता नागपूरकरांनी सजग राहावे आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.