'लाडकी बहीण' योजनेत घोळ करणाऱ्या १४ हजार पुरुषांवर कठोर कारवाई होणार;आदिती तटकरे यांची माहिती

    29-Jul-2025
Total Views |
 
Aditi Tatkare
 (Image Source-Internet)
मुंबई :
राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेत (Ladki Bahin scheme) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही योजना महिलांसाठी असतानाही तब्बल १४ हजार पुरुषांनी अर्ज सादर करून लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. ही माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 
तटकरे म्हणाल्या, योजना महिला सबलीकरणासाठी आहे, मात्र अपात्र अर्जदारांमध्ये अनेक पुरुषांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा अर्जांची चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.त्यांनी सांगितले की, “काही महिलांनी स्वतःचं बँक खाते नसल्यामुळे आपल्या नातेवाईक पुरुषांचे खाते नमूद केले असेल, ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र चौकशीनंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होईल.”
 
तटकरे पुढे म्हणाल्या, आमच्या निदर्शनास आले की, काही प्रकरणांमध्ये एका व्यक्तीने ३० पेक्षा अधिक बँक खाती या योजनेशी लिंक केली होती. यावर कठोर पावले उचलण्यात आली असून, अशा सर्व खात्यांवर तात्काळ निर्बंध घालण्यात आले आहेत.
 
पारदर्शकतेसाठी नियमित परीक्षण सुरूच-
महिला व बालविकास विभागाने योजनेची सातत्याने छाननी सुरु ठेवली आहे. तटकरे म्हणाल्या, “जानेवारीत कृषी विभागाकडून प्राप्त माहितीच्या आधारे काही महिलांना इतर योजनांचा लाभ देखील मिळत असल्याचे समोर आले. त्यामुळे या लाभार्थ्यांचीही पडताळणी सुरू आहे.”
 
विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर-
विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना तटकरे म्हणाल्या की, “ही योजना महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. त्यामुळेच विरोधक खवळले आहेत. काही जण मुद्दाम गैरसमज पसरवत आहेत, मात्र आमची कार्यपद्धती पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे.”