(Image Source-Internet)
मुंबई:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना काँग्रेसला (Congress) मराठवाड्यात मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते जालना येथील माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि परभणीचे नेते सुरेश वरपूडकर हे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दोघांचा पक्षप्रवेश होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमधील नाराज नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र आहे. आता गोरंट्याल आणि वरपूडकर यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
कैलास गोरंट्याल हे तीन वेळा जालना मतदारसंघातून आमदार राहिले असून त्यांचा स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव आहे. सुरेश वरपूडकर हेही परभणीतील ज्येष्ठ नेते मानले जातात. या दोघांच्या भाजप प्रवेशामुळे जालना, परभणी तसेच नांदेड जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निवडणुका जवळ आल्याने काँग्रेससाठी ही गळती डोकेदुखी ठरू शकते. पक्षातील नाराजी आणि नेतृत्वाबाबत असलेली संभ्रमावस्था यामुळे आणखी काही नेते बाहेर पडण्याची भीती आहे. दुसरीकडे भाजपकडून हे पक्षप्रवेश नियोजनबद्ध राजकीय डाव म्हणून पाहिले जात आहेत.