टोको बारमध्ये अवैध डीजे पार्टीवर सीताबर्डी पोलिसांचा धडक कारवाई; 1.10 लाखांचा साउंड सिस्टिम जप्त

    28-Jul-2025
Total Views |
 
Toquo Bar
 (Image Source-Internet)
नागपूर :
धरमपेठमधील टोको बारमध्ये (Toquo Bar) अधिकृत परवानगीशिवाय डीजे पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी रविवारी (२७ जुलै) पहाटे कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या आवाजात वाजवले जाणारे साउंड सिस्टिम जप्त केल्याची माहिती आहे.
 
पोलिस उपनिरीक्षक निलेश जयराम वाघ यांनी सांगितले की, रात्री १२.३५ वाजता शहराच्या नियंत्रण कक्षाला वायरलेस संदेशाद्वारे फर्जी कॅफेच्या परिसरातून डीजेचा कर्णकर्कश आवाज येत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर PSI वाघ, कर्मचारी सुरेश, प्रविण पीटर आणि चालक उमेश यांनी पोलिस मोबाईल युनिटसह घटनास्थळी धाव घेतली.
 
तपासादरम्यान, फर्जी कॅफे असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील टोको बारमध्ये डीजे सुरू असल्याचे आढळून आले. चौकशीत बार व्यवस्थापकाने आपली ओळख राहुल महादेव सोमकुवर (वय ४०, रा. शिवाजी गार्डन, शिवाजीनगर) अशी दिली. अधिकृत परवानगी मागितली असता, तो कोणतेही परवाना सादर करू शकला नाही.
 
यावेळी पोलिसांनी खालील साउंड सिस्टीम जप्त केली:
डीजे साउंड बॉक्स – अंदाजे किंमत २०,०००
मिक्सर – अंदाजे किंमत ९०,०००
जप्त साहित्य एकूण किंमत – १.१० लाख
 
पोलिसांच्या माहितीनुसार, टोको बारने यापूर्वीदेखील ध्वनीमर्यादा नियमांचे उल्लंघन केल्याची नोंद आहे. यावेळी परवानगीशिवाय डीजे वाजवून त्यांनी नागपूर पोलीस उपायुक्तांनी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन केले आहे.
 
या प्रकरणी भारतीय नवीन दंड संहिता (BNS) कलम २९३ आणि २२३, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३३(१), १३१ व ३६ अंतर्गत राहुल सोमकुवर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.