(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या निर्णायक कारवाईबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सविस्तर माहिती दिली. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सकाळपासून चर्चेला विलंब झाला होता, मात्र दुपारी २ वाजता ही चर्चा अखेर सुरू झाली.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, “६ आणि ७ मेच्या रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रीत करत ही कारवाई केली. यामध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि हँडलर्स ठार करण्यात आले. ही कारवाई अत्यंत अचूक आणि धाडसी होती.”
पहलगामच्या क्रौर्याला सडेतोड प्रत्युत्तर-
“दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून निर्दय हत्या केली होती. हा प्रकार फक्त अमानवी नव्हे, तर देशाच्या अस्मितेवर घाला होता,” असं म्हणत सिंह यांनी स्पष्ट केलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली आणि त्यातून ऑपरेशन सिंदूरची सुरूवात झाली.”
दहशतवाद्यांच्या घरात घुसून कारवाई-
"भारतीय जवानांनी शत्रूच्या घरात घुसून प्रत्युत्तर दिलं. ही कारवाई कोणत्याही प्रकारे युद्ध भडकवण्यासाठी नव्हती, तर ती फक्त स्वसंरक्षण आणि दहशतवादविरोधी होती," असं सिंह म्हणाले. त्यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या जवानांच्या पराक्रमाचे विशेष कौतुकही केलं.
पाकिस्तानचा हल्ला निष्फळ; भारताचं कडक उत्तर-
ऑपरेशननंतर पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न झाला. परंतु भारताच्या संरक्षण यंत्रणांनी हे हल्ले निष्फळ ठरवले. त्यानंतर भारतीय वायुदलाने १० मे रोजी पाकिस्तानच्या हवाई तळांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं.
ऑपरेशन सध्या स्थगित, पण तयारी पूर्ण-
राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं की, “ही कारवाई युद्धासाठी नव्हती, तर केवळ पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी होती. सध्या ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलं असलं, तरी पाकिस्तानने जर पुन्हा काही आगळीक केली, तर कारवाई पुन्हा सुरू होईल.