गणेश मंडळांसाठी नवा नियम; खड्डा खोदल्यास १५ हजारांचा दंड

    28-Jul-2025
Total Views |
 
Ganesh Mandals BMC
 (Image Source-Internet)
मुंबई:
मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप उभारणाऱ्या मंडळांसाठी यंदा बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक कठोर नियम लागू केला आहे. रस्त्यावर किंवा पदपथावर मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास आता संबंधित मंडळाला १५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी हा दंड केवळ २ हजार रुपये होता. त्यामुळे ही रक्कम सुमारे साडेसात पटीनं वाढली आहे.
 
या नव्या निर्णयामुळे अनेक गणेश मंडळांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मंडळांचे म्हणणे आहे की, गणेशोत्सव ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असून, सार्वजनिक मंडळं गेली अनेक वर्षं स्थानिक पातळीवर हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करत आली आहेत. मंडप उभारणीसाठी काहीवेळा खांबासाठी खड्डा खोदणे अपरिहार्य असते. मात्र आता प्रत्येक खड्ड्यासाठी इतका मोठा दंड लागल्याने मंडळांच्या खर्चात मोठी भर पडणार आहे. अनेक मंडळांनी हा निर्णय अन्यायकारक ठरत असून तो मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
 
यावर्षी राज्य शासनाने गणेशोत्सवाला 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून मान्यता दिली आहे. अशा पार्श्वभूमीवर मंडळांवर दंड लादणे हे उत्सवाच्या परंपरेला धक्का देणारे असल्याचं मत मंडळांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलं आहे.
 
दुसऱ्या बाजूला, बीएमसीने रस्त्यांचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. मंडळांनी मंडप उभारणी करताना खड्डाविरहित तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. जर रस्त्यांवर खड्डे आढळून आले, तर त्या दुरुस्तीचा खर्च आणि दंड संबंधित मंडळांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
 
दरम्यान, परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी 'एक खिडकी प्रणाली' कार्यान्वित करण्यात आली आहे. मंडळांनी https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.
 
बीएमसीच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या पारंपरिक तयारीवर मर्यादा येतील की काय, यावर सध्या मंडळांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. आता हा दंड कायम राहतो की काही सवलतीसह मागे घेतला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.