स्थानिक निवडणुकीत महायुतीसोबत लढा, पण भाजपचं बळ अधोरेखित करा; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना संदेश

    28-Jul-2025
Total Views |
 
CM Fadnavis
 (Image Source-Internet)
वर्धा :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local elections) पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून, पक्षाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यभर मेळावे सुरू केले आहेत. अशाच एका महामंथन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि निवडणूक रणनितीचे स्पष्ट संकेत दिले.
 
फडणवीस म्हणाले, "या निवडणुका आपण महायुतीच्या रूपात लढणार आहोत. मात्र, प्रत्येक ठिकाणी स्थानिक समन्वय साधून निर्णय घ्यावा लागेल. कुठे अडचणी असतील, तिथे शांतपणे चर्चा करा, पण मित्रपक्षांवर टीका करू नका."
 
"२०१७ मध्ये सत्ता असूनही शिवसेनेने सतत टीका केली होती. आपल्याकडून तसं वर्तन होऊ नये. महायुती होवो वा न होवो, मैत्रीपूर्ण स्पर्धा ठेवा. मात्र जिथे लढतो आहोत, तिथे भाजपचं वर्चस्व प्रस्थापित व्हायला हवं," असे त्यांनी स्पष्ट केलं.
 
कार्यकर्त्यांमध्ये असलेले अंतर्गत मतभेद दूर करण्याचेही आवाहन त्यांनी केलं. फडणवीस म्हणाले, भाजप हा एक परिवार आहे. घरात कधी मतभेद होतात, पण निवडणुकीच्या काळात हे भांडणं बाजूला ठेवायला हवीत. छोट्या वादांनी अनेक पक्ष मोडले आहेत. पक्षविघातक वागणूक सहन केली जाणार नाही.
 
भाजपची संघटनशक्ती किती प्रभावी आहे, याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, २२ जुलै रोजी एका दिवशी भाजप कार्यकर्त्यांनी ७८ हजार रक्ताच्या बाटल्या जमा केल्या, ज्याने शिवसेनेच्या २५ हजार बाटल्यांच्या विक्रमाला मागे टाकले.
 
फडणवीसांच्या या भाषणातून स्पष्ट होतं की भाजप स्थानिक निवडणुकीसाठी त्रिसूत्री रणनीती आखत आहे. आक्रमक प्रचार, संयमित वक्तव्य आणि प्रभावी संघटनशक्ती.