(Image Source-Internet)
नवी दिल्ली :
दिल्लीतील ‘ओबीसी पार्टनरशिप जस्टिस कॉन्फरन्स’मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. माध्यमांनी तयार केलेली नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ही वास्तवापेक्षा वेगळी असून, ती केवळ एक बनावट आणि भ्रामक प्रतिमा असल्याचा आरोप त्यांनी केला.
मी मोदींना भेटलो , ते फक्त एक कल्पना-
राहुल गांधी म्हणाले, “लोक विचारतात की राजकारणात मोठी अडचण कोण? अनेकांचं उत्तर असतं – नरेंद्र मोदी. पण माझ्या मते, मोदी हे स्वतः अडचण नाहीत. त्यांना माध्यमांनी इतकं मोठं केलं आहे की लोक त्यांच्या प्रतिमेने भारावून गेले आहेत. मी त्यांना दोनदा प्रत्यक्ष भेटलो आहे, त्यांच्यासोबत एकाच खोलीत बसलो आहे. ती प्रतिमा खोटी आहे – एक कल्पनारंजन,” असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
ओबीसी समाजाचा अभाव – व्यवस्थेवर राहुल गांधींचा सवाल
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरूनही निशाणा साधला. “ते हिंदू भारत म्हणतात, पण जर ५० टक्क्यांहून अधिक हिंदू ओबीसी असतील, तर निर्णय घेणाऱ्या ठिकाणी – जसे की कॉर्पोरेट क्षेत्र, मीडिया किंवा राजकीय नेतृत्वात – ओबीसी कुठे आहेत?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जातीय जनगणना आमचं ध्येय-
राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं की, काँग्रेसशासित राज्यांमध्ये जातीय जनगणना होणारच. “ही फक्त आकडेवारीसाठी नाही, तर प्रत्येक घटकाला योग्य प्रतिनिधित्व मिळावं, यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाच्या योगदानाला मान मिळालाच पाहिजे,” असं ते म्हणाले.
"एकदा ठरवलं, तर मागे फिरत नाही-
आपल्या लढ्याबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, “प्रियांका गांधींना विचारा – जर मी एखादं काम ठरवलं, तर ते पूर्ण होईपर्यंत मी थांबत नाही. जातीय जनगणना हे या लढाईचं पहिलं पाऊल आहे. अंतिम उद्दिष्ट हेच – भारतात प्रत्येक घटकाला सन्मान, अधिकार आणि स्थान मिळावं.”