सरकारी यंत्रणा काम न करता अडथळे निर्माण करतात; नितीन गडकरींचा संतप्त टोला

    26-Jul-2025
Total Views |
 
Nitin Gadkari
 (Image Source-Internet)
नागपूर :
मनपा, एनआयटी किंवा सरकारच्या अधीन असलेल्या संस्था कोणत्याच कामाच्या नाहीत. या सर्व संस्था चालू असलेल्या गाडीला पंक्चर करण्याचं काम करतात," अशा तीव्र शब्दांत केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी व्यवस्थांवर सडकून टीका केली आहे. नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित ‘खेल – एक करिअर’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, सरकारी यंत्रणांकडून अडथळे येतात, म्हणूनच वेगळा मार्ग अवलंबणं गरजेचं आहे. "मी नागपूरमध्ये ३०० स्टेडियम उभारण्याचं स्वप्न पाहतोय. पण यंत्रणांचा अकार्यक्षमपणा अडथळा ठरतो. त्यामुळे दुबईतील एका उद्योजकासोबत करार केला असून, तो येथे स्टेडियम चालवणार आहे. सरकार केवळ पायाभूत सुविधा देईल, पण देखभाल आणि व्यवस्थापन त्या उद्योजकाकडे असेल," असंही त्यांनी नमूद केलं.
 
"सरकार ही एक निरुपयोगी गोष्ट आहे," असे सांगताना त्यांनी उपस्थितांना बजावले की, "मोफत काही देऊ नका, कारण ज्याची किंमत दिली जाते, त्यालाच माणूस महत्त्व देतो. पैसे देऊन मेहनत करणारा कधीच गाफील राहत नाही."
 
गडकरी पुढे म्हणाले, “मी कोणताही चार्टर्ड अकाउंटंट नाही, पण चांगला आर्थिक सल्लागार आहे. ५ लाख कोटींच्या रस्ते आणि पूल प्रकल्पांची आखणी मी पैसे नसतानाही करतो.”
 
गडकरींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, नागपूरसह राज्यभरात त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारी यंत्रणांच्या अकार्यक्षमतेवर त्यांच्या भाष्याने, प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.