
(Image Source-Internet)
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमधून गणेशोत्सवासाठी कोकणात (Konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारकडून अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) एकेरी प्रवासासाठी लागू केलेली ३० टक्के भाडेवाढ अखेर मागे घेण्यात आली आहे. ही घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर दौऱ्यात केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो कोकणवासी गणपती साजरा करण्यासाठी आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, एसटीने यंदा एकेरी आरक्षणावर ३०% वाढीव दर जाहीर केल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भाडेवाढ रद्द करण्याचे निर्देश दिले.
एकनाथ शिंदे म्हणाले, "सामान्य प्रवाशांवर अनावश्यक आर्थिक भार पडू नये, यासाठी हा निर्णय घेतला." या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पूर्वीप्रमाणेच दरात तिकीट मिळणार असून त्यांच्या गणेशोत्सवाच्या तयारीला आर्थिक दिलासा मिळणार आहे.
एसटी ही कोट्यवधी प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे अशा सणासुदीच्या काळात भाडेवाढ न करता, जनतेच्या सोयीचा विचार करणं ही सरकारची लोकाभिमुख भूमिका अधोरेखित करते.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लवकरच कोकणासाठी एसटीच्या विशेष गाड्याही सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे गणपतीसाठी गावी जाण्याचा प्रवास आणखी सुलभ आणि परवडणारा होणार आहे.