नागपूर शहरात सहावे पोलीस परिमंडळ उभे राहणार; गृह विभागाचा गुन्हेगारी नियंत्रणासाठी निर्णायक पाऊल

    25-Jul-2025
Total Views |
 
Nagpur police
 (Image Source-Internet)
नागपूर :
शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारासोबत वाढणाऱ्या नागरी समस्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने नागपूर (Nagpur) पोलीस आयुक्तालयात सहावे पोलीस परिमंडळ स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.
 
सध्या अस्तित्वात असलेल्या पाचव्या परिमंडळाचे विभाजन करून हे नवीन सहावे परिमंडळ तयार करण्यात येणार असून, कळमना आणि पारडी हे या नव्या विभागाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. या भागांतील झोपडपट्ट्यांची संख्या, वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीची गती लक्षात घेता स्वतंत्र पोलीस परिमंडळाची गरज असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
 
या परिमंडळासाठी एक पोलीस उपायुक्त आणि दोन सहायक पोलीस उपायुक्तांच्या पदांना मान्यता देण्यात आली असून, प्रशासनाने ४२.१३ लाख रुपयांचा आवर्ती व ४०.९२ लाख रुपयांचा अनावर्ती खर्च मंजूर केला आहे.
 
या नव्या परिमंडळाच्या स्थापनेनंतर कळमना-पारडीसारख्या भागात पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय व कार्यक्षम पद्धतीने काम करू शकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. भविष्यात या क्षेत्रात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
 
या निर्णयामुळे नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यास मदत होणार असून, कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी तो निर्णायक ठरेल, असं सांगण्यात येत आहे.