(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान (Weather) सतत बदलत आहे. उष्णतेच्या लाटेमध्ये आता वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ९ मे रोजी नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह वीजांच्या गडगडाटात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या हवामान बदलामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारे ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहतील, तसेच विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात.
अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, थेट पावसाचा अंदाज नसला तरी दमट आणि उष्ण हवामानामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे.
तापमानातील चढ-उतार-
नागपूर, अकोला आणि चंद्रपूर या ठिकाणी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. वर्धा आणि गोंदियामध्ये तापमान ३८ अंशांच्या आसपास राहील. अमरावती व बुलढाण्यात मात्र तापमान तुलनेने थोडे कमी राहण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी
१० मेपासून संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट लागू होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. वीजेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी वादळी हवामानात अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.