शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राजकीय घडामोडीचा इशारा; रोहित पवारांच्या विधानाची चर्चा

    09-May-2025
Total Views |
 
Rohit Pawar
 (Image Source : Internet)
मुंबई :
राज्याच्या राजकारणात सध्या ‘दोन्ही राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र येणार?’ अशी चर्चा जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
 
अलीकडेच एका अनौपचारिक बैठकीत शरद पवार यांनी “दोन्ही गट एकत्र आले, तरी मला आश्चर्य वाटणार नाही,” असं म्हटलं होतं. तसेच, या संभाव्य एकीचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असंही त्यांनी सूचित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा जोर आला.
 
या पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले, “सध्या यासंदर्भात पक्षात कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. शरद पवार साहेबांनीही यावर आम्हाला कुठलाही सूचक संदेश दिलेला नाही. त्यामुळे माध्यमांत आणि सोशल मीडियावर जे बोललं जातंय, ते फक्त तर्कवितर्क आहेत.”
 
सत्तेत सहभागी होण्याबाबत संकेत?
रोहित पवार पुढे म्हणाले, आमचं लहानसं गट आहे. जवळपास १० आमदारांचा. त्यापैकी काहींना कदाचित असं वाटत असावं की लोकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करायचं असेल, तर सत्तेचा भाग व्हावं लागेल. त्यामुळे त्यांच्या भावना व्यक्त झाल्या असतील. पवार साहेबांनीही कदाचित याच पार्श्वभूमीवर एखाद्या संवादात त्याचा उल्लेख केला असेल.
 
अजित पवार गटाशी एकत्र येणार का?
अजित पवार गटासोबत जाण्याच्या चर्चेबाबत विचारले असता, रोहित पवार म्हणाले, जर शरद पवार साहेबांनी थेट विचारणा केली, तर मी माझं स्पष्ट मत मांडेन. पण आत्ता यावर काहीही भाष्य करणं योग्य नाही.
 
नवीन नेतृत्वाकडे वाटचाल?
शरद पवार यांचं नेतृत्व हळूहळू पुढील पिढीकडे सोपवण्याचा इशारा देत, रोहित पवार म्हणाले, सुप्रिया ताईंनी आम्हाला जे काही सांगितलं, त्याबाबत मी योग्य वेळी माहिती देईन.
 
राज्यातील वाढत्या जनतेच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करत, रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडीतील नेत्यांनी आता मैदानात उतरून संघर्ष करायला हवा. कामात एकत्रितपणे झोकून दिलं पाहिजे. कदाचित याच कारणामुळे शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचं वक्तव्य केलं असावं. राजकारणात पुढे काय होणार याबाबत सध्या तरी कोणताही अधिकृत निर्णय न घेतल्याचं स्पष्ट करत, रोहित पवार यांनी चर्चांना सध्या तरी थांबवण्याचा सल्ला दिला आहे.