(Image Source : Internet)
नागपूर :
पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) कारवाईचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जोरदार समर्थन केले आहे. या धाडसी पावलामुळे देशाचा आत्मसन्मान आणि जनतेचे मनोबल अधिक मजबूत झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतीय भूमीत सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघन आणि आतंकवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर संघाने केंद्र सरकारच्या निर्णयाचे आणि लष्कराच्या कार्यवाहीचे स्वागत करत, याला योग्य ठरवले आहे.
संघाचे अधिकृत निवेदन-
संघाने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि लष्कराने घेतलेली ठाम भूमिका ही योग्य आणि प्रशंसनीय आहे. या निर्णायक कारवाईमुळे देशात नवा विश्वास निर्माण झाला आहे.”
संघाने स्पष्ट केले की, दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर व त्यांच्या पाठीराख्यांवर केलेली कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य आहे. संकटकाळात संपूर्ण देश एकदिलाने सरकार आणि सैन्याच्या पाठीशी आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांना आवाहन-
पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संघाने मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. यावेळी देशातील नागरिकांनी एकजुटीने सरकारच्या सूचना पाळाव्यात, आणि समाजात अस्थैर्य निर्माण करणाऱ्या शक्तींना थारा देऊ नये, असा संदेशही संघाने दिला.
शेवटी, संघाने नागरिकांना देशभक्तीचे दर्शन घडवण्याचे आवाहन करत, गरज पडल्यास लष्कर व प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे म्हटले आहे.