(Image Source : Internet)
राज्यातील महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. "मुख्यमंत्री लाडकी बहीण"( Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सुमारे अडीच कोटी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य तर मिळेलच, त्यासोबतच 'रुपे कार्ड' देखील दिले जाणार आहे.
'रुपे कार्ड'मुळे आर्थिक सक्षमीकरणाला गती-
नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा करण्यात आली. हे 'रुपे कार्ड' बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून महिलांना दिले जाणार असून, याचा वापर ठराविक व आवश्यक सेवांसाठी करता येईल. या कार्डाचा उपयोग मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये किंवा तंबाखूजन्य उत्पादने विकणाऱ्या ठिकाणी करता येणार नाही.
लवकरच नाशिक विमानतळावर 'ई-पिंक रिक्षा' सुविधा-
कार्यक्रमात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी काही महिलांना ई-पिंक रिक्षा देखील देण्यात आल्या. मंत्री तटकरे यांनी सांगितले की, लवकरच नाशिक विमानतळ परिसरात पिंक रिक्षा सेवा सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम महिलांच्या रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.