मुंबईत हायअलर्ट; समुद्रकिनारे व धार्मिक स्थळांवर जाण्यास सक्ती

    09-May-2025
Total Views |
 
High alert
 (Image Source : Internet)
मुंबई :
पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळालं. मात्र यानंतर सीमारेषेवर पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, जो भारतीय लष्कराने हाणून पाडला. या पार्श्वभूमीवर मुंबईत उच्च सतर्कता पाळली जात असून शहरातील महत्त्वाच्या स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
मुंबईतील धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे तसेच समुद्रकिनाऱ्यांवर हायअलर्ट लागू करण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता गोराई चौपाटी, समुद्रकिनारी असलेली हॉटेल्स, लॉजेस आणि बोटींच्या सेवांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. शहरातील अन्य किनारे देखील नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
 
सिद्धिविनायक मंदिरात भाविकांच्या प्रवेशावर मर्यादा-
सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. सध्याच्या तणावपूर्ण वातावरणामुळे भाविकांची गर्दी टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने खबरदारीचा निर्णय घेतला आहे. मंदिर दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार असले तरी, अतिरिक्त सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
 
साकीनाका परिसरात ड्रोन सदृश हालचाल-
साकीनाका परिसरातील एका नागरिकाला विमानतळाजवळ ड्रोनसदृश वस्तू दिसल्याचा दावा करण्यात आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसराची झडती घेतली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो, त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
 
पालघर जिल्ह्यात कडक तपासणी सुरू-
पश्चिम किनारपट्टीवर संभाव्य घातपात टाळण्यासाठी पालघर पोलीस सज्ज झाले आहेत. ८३ किलोमीटरच्या सागरी किनारपट्टीवर असलेल्या ३८ लँडिंग पॉईंटवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी जोरात सुरू असून हॉटेल्स व लॉजेसचीही कसून पाहणी केली जात आहे. पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.