भारत-पाक तणावामुळे बीसीसीआयचा निर्णय;IPL 2025 ला स्थगिती!

    09-May-2025
Total Views |
 
BCCI postponed IPL
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली:
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
 
गुरुवारी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला 58वा सामना अचानक अर्धवट थांबवण्यात आला. पंजाबचा डाव चांगल्या सुरुवातीला होता – 10.1 षटकांत 1 बाद 122 धावा झालेल्या अवस्थेत एक फ्लडलाइट बंद झाली. त्यानंतर संपूर्ण स्टेडियम अंधारात गेले आणि प्रेक्षकांना तातडीने बाहेर काढण्यात आले.
 
ही संपूर्ण सुरक्षा कारवाई जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर परिसरात पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर करण्यात आली. भारतानेही त्वरित प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या सहा क्षेपणास्त्रांचा नाश केला असून अनेक ड्रोन निष्क्रिय करण्यात आले आहेत.
 
या घटनांमुळे बीसीसीआयपुढे खेळाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उभे राहिले. परिणामी, पुढील आदेश येईपर्यंत IPL 2025 ला स्थगिती देण्यात आली आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर आणि सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पुढील सामना खेळवला जाईल.
 
क्रिकेटप्रेमींसाठी ही बातमी खंतजनक असली तरीही, देशहित आणि सुरक्षेचा विचार करता हा निर्णय आवश्यक असल्याचे बीसीसीआयने नमूद केले आहे.