(Image Source : Internet)
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला पर्यटकांवर नव्हता तर भारताच्या सार्वभौमत्वावर होता त्यामुळे भारत पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यास कधी चोख प्रतिउत्तर देणार ? असा प्रश्न विचारला जात होता. याचे उत्तर बुधवारी मिळाले. बुधवार ७ मे रोजी मध्यरात्री १ वाजून २८ मिनिटांनी भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरवर हवाई हल्ले केले. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळावर हल्ले करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात शेकडो दहशतवादी ठार झाले आहेत.
भारताने केलेल्या या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याचा आकडा समोर आला नसला तरी या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याची शक्यता असून यात लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदचे अनेक मोठे दहशतवादी ठार झाले आहेत. भारतीय हवाई दलाने जवळपास २३ मिनिटे हल्ले केले. भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला ऑपरेशन सिन्दुर असे नाव देण्यात आले. पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात ज्या भारतीय महिलांचे कुंकू ( सिन्दुर ) पुसले गेले त्या महिलांच्या सन्मानार्थ या मोहिमेला लष्कराने ऑपरेशन सिन्दुर असे नाव दिले. ऑपरेशन सिन्दुर यशस्वी करून भारतीय सैन्याने पहलगाम येथे मरण पावलेल्या २६ पर्यटकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याची ही कामगिरी अभिमानास्पद आहे.
पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याच्या या गौरवपूर्ण कामगिरीने १५० कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय सैन्याच्या या कामगिरीचा देशवासीयांना सार्थ अभिमान असून १५० कोटी भारतीय भारतीय सैन्यदलापुढे नतमस्तक आहे. जो भारताकडे तिरक्या नजरेने पाहिल त्याला भारत घरात घुसून मारेल असा इशाराच भारताने जगाला दिला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ॲक्शनला रीॲक्शन मिळणारच. हा भारत २०२५ चा भारत आहे हे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ही मोहीम यशस्वी करून भारतीय सैन्यदलाने आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे. अर्थात भारताने पाकव्याप्त काश्मीरवर केलेला हा पहिला हवाई हल्ला नाही. या आधी २०१६ आणि २०१९ साली भारताने असाच हवाई हल्ला करून पाकिस्तानला इशारा दिला होता.
मात्र दोनदा हवाई हल्ले झाल्यानंतर देखील पाकिस्तानची खोड मोडली नाही पाकिस्तानने दहशतवाद्यांना आर्थिक आणि लष्करी मदत करणे चालूच ठेवले त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागले. आता तरी पाकिस्तानने शहाणे व्हावे व दहशतवाद्यांना केली जाणारी लष्करी व आर्थिक मदत थांबवावी नाही तर भारत यापेक्षाही मोठी कारवाई करेल. १९७१ साली भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले जर पाकिस्तानने आपली खोड मोडली नाही तर भविष्यात पाकिस्तानचे चार तुकडे होतील. भारताने पाकव्याप्त काश्मीरवर केलेल्या या हवाई हल्ल्याला पाकिस्तान कसे उत्तर देईल हे पाहावे लागेल. अर्थात या हवाई हल्ल्याला पाकिस्तानने प्रतिउत्तर दिले तर ती पाकिस्तानची सर्वात मोठी चूक ठरेल जर पाकिस्तानने तसे केले तर भारत - पाकिस्तान युद्धाला तोंडच फुटेल. भारत पाकिस्तान युद्धाला तोंड फुटले तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरून गायब होऊ शकतो याचे भान पाकिस्तानने ठेवावे.
पाकिस्तानने चीनच्या भरवश्यावर भारताशी दोन हात करू नयेत कारण आजचा भारत हा चीनलाही जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे. चीननेही पाकिस्तानची बाजू लावून धरू नये कारण दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात भारताला अनेक देशांची साथ आहे. अमेरिका, इस्राईल, जपान, रशिया या देशांनी आताच भारताला पूर्ण पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानला जरी तुर्कस्तान, मलेशिया आणि काही इस्लामिक राष्ट्रांनी पाठिंबा दिला असला तरी जगातील सर्व प्रमुख देश भारतच्या बाजूने आहे हे पाकिस्तानने विसरू नये. पाकिस्तानने जर पुन्हा भारताची कुरापत काढली तर त्याची शिक्षा पाकिस्तानला मिळेलच यात शंका नाही. ऑपरेशन सिन्दुर यशस्वी करणाऱ्या भारताच्या सैन्यदलाला सॅल्युट! जयहिंद !!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५