भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांचा केला नायनाट!

    07-May-2025
Total Views |
 
Operation Sindoor
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली:
भारताने पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात निर्णायक पावले उचलत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या हवाई कारवाईत केवळ २३ मिनिटांत दहशतवाद्यांना प्रतिउत्तर देण्यात आले. हा एक प्रकारे पहलगाम हल्ल्याचा बदला मानला जात आहे.
 
भारतीय वायुदलाने ही मोहिम मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास राबवली. ब्रह्मोस आणि स्कॅल्प क्षेपणास्त्रांच्या अचूक फटक्यांनी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तळांवर निशाणा साधण्यात आला. ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावर आणि रॉच्या गुप्त माहितीनुसार काटेकोरपणे नियोजित करण्यात आली होती.
 
हल्ल्याची ठिकाणं:
बहावलपूर (पाकिस्तान) – जैश-ए-मोहम्मदचं मुख्य ठिकाण, सीमेपासून १०० किमी अंतरावर.
मुरीदके (पाकिस्तान) – लष्कर-ए-तैयबाचं केंद्र, २६/११ हल्ल्याशी संबंधित.
गुलपूर (पीओके) – एलओसीपासून ३५ किमीवरील जैशचं तळ.
सवाई कॅम्प (पीओके) – तंगधार सेक्टरमध्ये असलेला लष्करचा बेस.
बिलाल कॅम्प (पीओके) – जैशचा लॉन्चपॅड.
कोटली (पीओके) – लष्करचं मोठं शिबिर, ५० हून अधिक दहशतवाद्यांची क्षमता.
बर्नाला कॅम्प (पीओके) – एलओसीपासून अवघ्या १० किमीवर स्थित.
सरजाल कॅम्प (पाकिस्तान) – जैशचं कठुआजवळील प्रशिक्षण केंद्र.
मेहमूना कॅम्प (सियालकोट) – हिज्बुलचं प्रशिक्षण शिबिर.
 
संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, या कारवाईत पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलेले नाही. ही कारवाई केवळ दहशतवादी अड्ड्यांवर केंद्रित असून, भारताने अत्यंत संयम राखत ही पावले उचलली आहेत.
 
२०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राईकनंतर प्रथमच भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या मुख्य भूमीवर थेट कारवाई केली आहे.