(Image Source : Internet)
मुंबई :
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक पवित्रा घेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या विरुद्ध निर्णायक कारवाई केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय वायुदलाने बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथील नऊ दहशतवादी केंद्रांवर जोरदार हल्ला चढवला.
या धडक कारवाईमुळे देशभरातून भारतीय लष्कराच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतातील भूमीवर केलेल्या हल्ल्याचे तितक्याच तीव्रतेने उत्तर देत भारताने आपला दृढ निश्चय दाखवून दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "आजचा दिवस प्रत्येक भारतीयाच्या गर्वाचा आहे. भारतावर वार करणाऱ्यांना योग्य धडा शिकवला जातो, आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे."
फडणवीसांनी लष्कराच्या पराक्रमास सलाम करत जनतेला या विजयाचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. "ही कारवाई केवळ प्रतिशोध नाही, तर भारताच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे," असेही त्यांनी नमूद केले.