ऑपरेशन सिंदूर’नंतर अमित शाह यांची सुरक्षा आढावा बैठक; सीमावर्ती 9 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी

    07-May-2025
Total Views |
 
Amit Shah
 (Image Source : Internet)
नवी दिल्ली :
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर निशाणा साधत मोठी कारवाई केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करत अंदाजे 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर देशात सतर्कतेचा इशारा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची सुरक्षा आढावा बैठक घेतली.
 
या बैठकीत जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या सीमावर्ती राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यांच्यासोबतच लडाख आणि जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल, तसेच सर्व संबंधित राज्यांचे डीजीपी आणि मुख्य सचिवही या बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यातील सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासली आणि पुढील उपाययोजनांचा आढावा घेतला.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सविस्तर माहिती दिली आहे. या कारवाईत अनेक कुख्यात दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात पुढील दिशा ठरवली जाणार आहे.