(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
रस्ते अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या नागरिकांना त्वरित व विनामूल्य वैद्यकीय सेवा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना 2025’ या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली असून, ती ५ मे २०२५ पासून देशभरात लागू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत कोणत्याही मोटार वाहनाच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस सूचीबद्ध रुग्णालयात १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस (रोखमुक्त) उपचार दिला जाणार आहे. अपघाताच्या दिवशीपासून पुढील सात दिवसांपर्यंत या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये:
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस सूचीबद्ध रुग्णालयात तातडीने कॅशलेस उपचार मिळणार.
उपचाराचा खर्च केंद्र सरकारकडून दिला जाणार असून मर्यादा १.५ लाख रुपये इतकी असेल.
योजना लागू झाल्यानंतर अपघातग्रस्त रुग्णांना आर्थिक अडचणी न येता तातडीची मदत मिळणार.
सूचीबद्ध रुग्णालयांशिवाय इतर ठिकाणी केवळ प्राथमिक उपचार आणि स्थिरीकरणासाठीच उपचाराची परवानगी असेल.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) हे प्रमुख समन्वयक म्हणून कार्य करणार आहे.
या योजनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वीच संकेत दिले होते. आता अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस, रुग्णालये आणि राज्य आरोग्य संस्था यांच्यात सुसंवाद ठेवण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे देशातील अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळवणे सोपे होणार असून, अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.
यासंबंधी अधिक माहिती लवकरच सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.