(Image Source : Internet)
नागपूर:
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या (Local body elections) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्यात चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून, जुन्या आरक्षणाच्या आधारेच निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत, राज्य निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणुकीची तयारी सुरू करावी अशी मागणी केली आहे.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती-
६ मे रोजी देशभरात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. त्याच दिवशी मंगळवारी राजमातांच्या जन्मस्थळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महायुती एकत्र येऊन निवडणुका लढेल-
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “न्यायालयाने जुन्या आरक्षणाच्या आधारे निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे, हे आम्ही स्वागतार्ह मानतो. यामुळे योग्य आणि न्यायपूर्ण प्रक्रिया होईल.”
महायुतीच्या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र येऊन निवडणुका लढेल. काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार वेगळे निर्णय होऊ शकतात, पण धोरणात्मकदृष्ट्या महायुती एकत्रच निवडणुका लढवेल.”
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांसाठी महायुतीचे एकत्र येण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात चांगलेच उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.