(Image Source : Internet)
अहिल्यानगर :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अहिल्यानगरवासीयांना बहुप्रतीक्षित वैद्यकीय महाविद्यालय देण्याची मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे संपूर्ण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम होणार असून, विद्यार्थ्यांसाठीही वैद्यकीय शिक्षणाची नवी दारे उघडली जाणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट निर्मिती होणार असल्याचेही जाहीर केले. चौंडी गावाचा तिर्थक्षेत्र म्हणून विकास केला जाणार असून, त्यासाठी ६८१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.
फडणवीस सरकारने राज्यातील विविध महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी एकूण ५५३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये तुळजाभवानी मंदिरासाठी १८६२ कोटी, त्र्यंबकेश्वरसाठी २२१ कोटी, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासाठी १४४५ कोटी आणि माहूरगडाच्या विकासासाठी ८२९ कोटी रुपयांचा समावेश आहे.
ही ऐतिहासिक बैठक विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निमंत्रणावरून पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राज्यातील अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या निर्णयांनी चौंडी व आसपासच्या भागाला नवसंजीवनी मिळणार असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे.